शिवाजी महाराजांची कीर्ती महान होती. त्यांनी शून्यातून स्वर्ग निर्माण केला व हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. तेव्हा पासून अगदी आजतागायत किंबहुना कायमसाठी मराठ्यांना मानाने जगायला लावले, असा एक
सिंह ज्याचा दरारा संबंध भारतात होता त्या सिंहाचा छावा किती अफाट आणि शूरवीर असेल.
![]() |
सिंहाच्या जबड्यात घालून हात | मोजीन दात हि जात मराठ्याची || |
छत्रपति संभाजी राजे उर्फ शंभू राजे यांचा जन्म इ.स १६५७ रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्यात झाला.खरंतर हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे चालवणं आणि टिकवून ठेवण हि काठीणातली कठीण गोष्ट होती. याची जबाबदारी शंभू राजेंवर होती. असंख्य अडचणी, शत्रू, दगा, फितुरी यांचा सामना करून मराठ्यांचा भगवा दिमाखात फडकवला आणि शिवपुत्र असण्याची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली
संभाजी राजे यांनी अत्यंत लहान वयापासून दुःख, यातना यांचा सामना केला. शंभू राजेंच्या जन्मानंतर त्यांच्या अत्यंत लहान वयात त्यांची आई - सईबाई यांचे निधन झाले पुण्याजवळील 'धाराऊ' नावाची एक स्त्री त्यांची दुध-आई बनली. पुढे त्यांचा सांभाळ जिजाबाईंनी केला. ज्या वाघिणीने शिवरायांना घडवले तिनेच ह्या शंभूराजेंना घडवले अर्थातच शंभू राजे अत्यंत चाणाक्ष आणि हुशार बनले.
संभाजी महाराज हे अत्यंत सुंदर आणि देखणे होते त्याचं व्यक्तिमत्वसुद्धा त्यांच्या शौर्याप्रमाणे अफाट होतं. शूरता तर त्यांच्या नसानसात भिणली होती. कमी वेळात राजकारणातील सूक्ष्म गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. लहान वयापासून ते शिवाजीराजेंसोबत असल्यामुळे युद्ध आणि राजकारण यातील बारीक बारीक गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे कि शिवाजी महारजांच्या आग्रा भेटीत शंभू राजे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यावेळी त्यांचे वय फ़क़्त ९ वर्ष होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजे इ.स १६७४ पर्यंत शंभू राजे सर्व बाबतीत एकदम तरबेज झाले. खरतर त्यांचा स्वभाव फार विनम्र होता आणि त्यामुळे अनेकांस ते आपले आपलेसे वाटत असत.
राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे मायेने पाहणारे कोणीही उरले नाही कारण शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी सतत गुंतून राहिले होते. कालांतराने शंभू राजेंचे दरबारातील काही मंडळींशी मतभेद सुरु झाले. इथे बीज रोवलं गेलं येणाऱ्या काळात होणाऱ्या मोठ्या फितुरीचे आणि एका हृदयद्रावक घटनेचे. आण्णाजी दत्तो नामक एक अमात्य दरबारात कारभार पाहत असत. अत्यंत भ्रष्ट अशा अण्णाजी बद्दल महाराजांना कल्पना होती पण ते एक उत्तम प्रशासक असल्यामुळे महाराजांनी दुर्लक्ष केले. शंभू राजेंना हे फार खटकत असत. त्यांना त्यांचा हा भ्रष्ट कारभाराचा त्यांनी सतत विरोध केला. आण्णाजी दत्तो आणि त्यांसोबातची इतर मंडळी शंभू राजेंच्या विरोधात गेली व दरबारात सतत शंभू राजेंना अपमानास्पद वागणूक दिली.
![]() |
संभाजी राजेंचा राज्याभिषेक व आनंदलेली प्रजा |
अनेक हाल अपेष्टा, कटकारस्थान सहन केल्यानंतर इ.स १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोहिमा त्यांनी पार पाडल्या. अत्यंत कमी काळाची कारकीर्द त्यांची पण त्यांच्या पराक्रम आणि यशामुळे काळाला सुद्धा त्यांनी मागे टाकले. औरंगजेबाचे सैन्य शंभू राजेंच्या सैन्यापेक्षा पाच पट जास्त होते. किंबहुना त्याकाळी भारतातील नव्हे तर साऱ्या जगातील शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. पण शंभू राजेंच्या नेतृत्वामुळे मराठ्यांनी कडवी झुंज दिली आणि त्या औरंगजेबाला हैराण करून सोडले. फ़क़्त शौर्य आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मराठ्यांचा ध्वज आसमंतात डौलाने फडकवला.
गोव्यातील पोर्तुगीज, मैसूरचा चीक्क्देवराय असो कि जंजिऱ्याचा सिद्दी सर्वांना सिंहाच्या ह्या छाव्याने हैराण करून सोडले. व ह्या छाव्याविरुद्ध औरंगजेबास मदत करण्याची कोणाची हिंमत झाली नाही.
अनेकांनी जंजिरा किल्ला पाहिलाच असेल तिथूनच लांबवर समुद्रात आपल्याला एक किल्ला दिसतो तो म्हणजे पद्मदुर्ग- कासा किल्ला. फार कमी जणास माहित आहे कि हा किल्ला जंजिऱ्याला झुंज देण्यासाठी शंभू राजेंनी बांधला आहे. शंभू राजेंच्या ह्या पराक्रामुळे आणि निर्भिडतेपुढे सिद्दी सुद्धा चिंताक्रांत झाले. अनेक शत्रूंना एकाच वेळी झुंज देणारा हा शिवपुत्र शंभू.
![]() |
जंजिऱ्याची पाहणी करताना |
शंभू राजे यांनी अनेक कठीण मोहिम जिंकल्या , अनेक किल्ले जिंकले व बांधले. शूरवीर तर ते होतेच पण उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारसुद्धा होते. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण - राजनीती' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. उत्तम व्यक्तिमत्व, सुंदर व देखणे, शौर्यवान, निर्भीड, अन्यायाची चीड असणारे तसेच संयमी अशा असंख्य गुणवत्ता शंभू राजेंमध्ये होत्या.
शंभू राजेंशी झुंज देणे तर पार कठीण होऊन बसल्यामुळे आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे आणि ह्या विराला आता थांबवावेच लागेल ह्या विचाराने औरंगजेबाने तयारी करण्यास सुरुवात केली. इ.स १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. आणि परिस्थिती कठीण झाली शंभू राजेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी अनेक फितूर तत्पर होतेच. अशा अनेक फितुरांचा त्यांनी सामना केला होता पण दुर्दैवाने ह्या वेळेस फितूर निघाला त्यांचा सख्खा मेहुणा- गणोजी शिर्के, काही गावांच्या वतनदारीसाठी हा शत्रुत सामील झाला होता.
इ.स १६८९ च्या सुरुवातीला शंभू राजेंना त्यांच्या महत्वाच्या सरदारांनी कोकणात संगमेश्वर मध्ये बैठकीसाठी बोलावले १ फेब्रुवारी १६८९ रोजी शंभू राजे रायगडात रवाना होत असताना त्यांच्या मेहुण्याने आणि
औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरमध्ये हल्ला केला, मजबूत चकमक झाली. नदी सागरास भेटते, इथे तर संपूर्ण सागर नदीस भेटण्यास आला. मोठा सैन्यसागर आणि काही मराठी सैन्य ह्यांनी कडवी झुंज दिली पण संख्यने कमी असल्यामुळे हार पत्करावी लागली आणि शंभू राजे व कवी कलश ह्यांना जिवंत पकडण्यात आले. त्यांना औरंगजेबाकडे बहादूरगड - धर्मवीर गडावर नेण्यात आले. पुढे काय घडले हे आपल्या अंगावर काटा आणेल.
![]() |
शत्रूशी झुंज देताना शंभू राजे |
कदाचित इतिहाससुद्धा रडत असेल कारण तो एका अत्यंत भयावह, हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणाऱ्या मृत्यूचा साक्षी होणार होता. औरंगजेबाने शंभू राजेंना सर्व किल्ले स्वाधीन करण्यास आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले अर्थातच शंभू राजेंनी स्पष्ट नकार दिला चिडलेल्या औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांना विदुषकासारखे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक धिंड काढली. शंभू राजे तरीसुद्धा शरण येत नाहीत हे पाहून त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले. त्यांना एका घाणेरड्या उंटावर उलटे बसवले आणि साखळदंडाने बांधून टाकले. आपल्या प्रिय पित्यांनी - शिवरायांनी दिलेली कवड्यांची माळा काढून गळ्यात गुराढोरांना सुद्धा सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधली. गुन्हेगारांना घातल्या जायच्या तशा इराणी लाकडी टोप्या दोघांना घातल्या. फळ्यांचा खोड मानेवर ठेवला आणि दोन्ही हात बांधले व त्या फळ्यांवर घुंगरे बांधली.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम इंद्रायणी-भीमा नदीच्या संगमावर तुळापुर येथे हलवला आणि शंभू राजे व कवी कलश ह्यांना तिथेच हलाल करण्याचे ठरवले. कदाचित काळ व वेळ सुद्धा पुढे सरसावण्यास धजत नसतील कारण एका महाभयंकर अशा मृत्यला ते पाहणार होते.
औरंगजेबाची आज्ञा होताच हबशी पुढे सरसावले. शंभू राजेंचे डोळे - छे हो, त्या तेजस्वी नेत्रावर आघात होणार होता. जशी रवि रांजणातून फिरवावी अशा तप्त आणि ज्वलंत सळ्या त्यांच्या डोळ्यात आत आत पर्यंत फिरवल्या, चर्रचर्र आवाज करत कातडी होरपळून निघाली उपस्थित सर्व थरारात होते पण शंभू राजेंनी किंचितसा सुद्धा आक्रोश केला नाही. साधा काटा रुत्ल्यावर आपल्याला वेदना सहन होत नाहीत इथे तर तप्त सळ्याच्या वेदना त्याही डोळ्यात खोलवर !!!!!!!!!!!
जीभ छाटण्यासाठी हबशी आले पण शंभू राजेंनी तोंड बंद केले होते. जबडा उघडण्यासाठी ते राक्षस पुढे आले जोर लावला तरी जबडा उघडेना. त्यांच्या कानावर जोरदार आघात केला.कान दाबले तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता. एकाने मस्तकावर जोरदार प्रहार केला तरी सुद्धा शंभू राजेंनी जबडा उघडलाच नाही. वाघाच्या जबड्यात हाथ घालणारा तो सिंहाचा छावा सहजसाजी कसा जबडा उघडेल. एकानी युक्ती केली नाक दाबले आणि श्वास घेण्यासाठी शंभू राजेंनी तोंड थोडे उघडले. राक्षसाने डाव साधला आणि साणशीने जीभ खेचली .तलवारीने साssप वार केला आणि जीभ कापली. खाली पडलेली जीभ वळवत होती. जणूकाही आकांत करत होती, शंभू राजेंपासून विलग होण्याचा शोक करत होती.
![]() |
मृत्यूलाही नमवताना शंभू राजे |
त्यांची मान पकडून पाठीतलं आणि पुढे छातीवरून कातडं सोलून काढलं आणि जखमेवर मिठाचे पाणी ओतले. तरीसुद्धा ह्या शंभू राजेंनी काहीच आक्रोश केला नाही. हात पाय कापले गेले पण मृत्यूशी झुंज देणं थांबलं नाही. अरे, एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस मृत्यूशी झुंज दिली, मृत्यूला सुद्धा झुकायला लावलं. हताश झालेला तो दैत्य औरंगजेब शेवटी मस्तक कलाम करण्याची आज्ञा देतो. इ. स ११ मार्च १६८९ गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभू राजेंचे मस्तक कापले जाते. मस्तकाची गुढी उभारली जाते वाजत गाजत इंद्रायणी-भीमा नदीच्या तीरावर आणली जाते. भाला रेतीत रोवतात आणि त्यावरील असलेल्या त्या पराक्रमीच्या मस्तकातील रक्ताचा थेंब नदीत पडतो जणू कदाचित त्या नदीला सुद्धा आपल्या लेकाचं मस्तक आणि तिच्यावर पडणारा थेंब पाहून हंबरडा फुटला असेल. तीसुद्धा रडत असेल म्हणत असेल "एके काळी पराक्रम करून माझ्या सभोवती फिरणारा माझा लेक अशा अवस्थेत मला पाहवत नाही. "
तो दैत्य औरंगजेब सुद्धा शेवटी म्हणाला " खरच सिंहाचा छावा होता हा संभा, आम्ही डोळे काढले तरी झुकला नाही, आम्ही जीभ छाटली तरी दयेची भिक मागितली नाही, आम्ही पाय कापले तरी गुडघे टेकवले नाहीत, आम्ही मान कापली तरी ती झुकली नाही. माझ्यासोबत इतर कोणीही नसतं पण हा संभा असता तर मी संपूर्ण जग जिंकलं असतं."
संयम, निष्ठा, शौर्य, धर्माबद्दल प्रेम हे शंभू राजेंकडून शिकावं. ज्यांनी मृत्यला सुद्धा झुंजवलं आणि समस्त जगाला लढायची प्रेरणा दिली अशा संभाजी राजेंना कोटी कोटी प्रणाम.
source: wikipedia, शिवचरित्र भाष्यकार नितीन बालगुडे पाटील यांचे भाषण