Wednesday, 9 November 2016

शिवडीचा किल्ला

एक दिवस मित्रासोबत बोलत असताना मुंबईतल्या किल्ल्यांचा विषय निघाला आणि मुंबईतल्या किल्ल्यांची आम्ही यादी काढू लागलो व  आश्च्यर्य वाटलं कि ह्यापैकी अनेक किल्ले हे आपल्या  नेहमीच्या प्रवासात जवळपासच आहेत शिवाय ह्या किल्ल्यांचा इतिहास हि फार सुंदर आहेच.  लागलीच आम्ही ह्यापैकी एक किल्ला सर करण्याचे ठरवले आणि तो म्हणजे शिवडीचा किल्ला 

शिवडीचा किल्ला

अशाच एका मधल्या वारी सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघांनी शिवडीचा किल्ला बघण्याचा बेत आखला. मी बाईक घेऊन निघालो आणि ह्या मित्राला परळ ला पिक अप केले व शिवडीच्या दिशेने वाटचाल केली. तसा मुंबईच्या दक्षिण पूर्व भागात जाण्याचा संबंध फारच कमी आला होता. हा  विभाग  मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत येत असल्याने लोकवस्ती कमीच होती. बाईक वरून जाताना मध्ये हार्बर लाईन रेल्वेचे फाटक लागले आणि तिथे आम्हाला थांबावे लागले पुष्कळ वेळ झाला तरी फाटक सुरु होत नव्हत कारण अत्यंत कमी वेळात ट्रेन्स जात होत्या.. ह्या फावल्या वेळात आम्ही तिथे काही माणसांना किल्ल्या बद्दल विचारणा केली पण आश्चर्य म्हणजे अनेकांना शिवडीला किल्ला आहे हे माहीतच नव्हते आणि ज्यांना माहित होते त्यांना कसं जायचा ह्याची कल्पना सुद्धा नव्हती. फाटक क्रॉस केल्यावर लागलीच एका दुकानवाल्याला आम्ही विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेने आम्ही कूच केली. आमच्या सवयी प्रमाणे आम्ही अधुन मधून काही जणांना विचारत विचारत किल्लाजवळ जात होतो..

पण किल्ल्याकडे जात असताना एका गोष्टीच आम्हाला आश्चर्य वाटलं कि मुंबईच्या ह्या  दक्षिण पूर्व भागात लोकवस्ती तर नव्हतीच पण वाहने सुद्धा चुकून माकून दिसत होती. आम्ही मुद्दाम बाईक चा स्पीड कमी केला कारण एका बाजूनी हवेचा झोत समुद्राची  चाहूल लागून देत होता आणि आमची नजर कुठे समुद्र दिसतो का ह्या कडे गेली. आमचा वाक्य पूर्ण होतो ना होतो तोवर लहानशी वाट दिसली आणि तिथून समुद्र किनारा दिसला  पुढे गेलो असता एका पोलिसांनी आम्हाला अडवले आणि रेस्ट्रिक्टेड एरिया असल्यामुळे कोणालाही तिचे येण्याची परवानगी नाही असे सांगितले शेवटी त्याच पोलिसांना शिवडीच्या किल्ल्याबद्दल विचारून आम्ही आमचा मोर्चा किल्ल्याकडे वळवला.

पुढे गेल्यावर किल्ल्याची तटबंदी आम्हाला दिसू लागली आणि लागलीच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. एक लहानशी चाळ आणि त्यातली तुरळक घरे व एक दोन मजली इमारत वगळता आसपास जास्त काही वर्दळ नव्हतीच. भरपूर वेळाने आम्हाला माणसांची वस्ती दिसली होती.
किल्ल्यावरच्या पायऱ्या


थोड्या उंचवट्यावर बाईक नेली आणि जिथून पायऱ्यांची सुरवात होते त्या ठिकाणी बाईक आम्ही पार्क केली. आणि किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्यावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या ह्या सुमारे चार ते पाच फूट लांब होत्या.


तटबंदीवरुन दिसणारा समुद्र


पण जशी अपेक्षा केली होती तशा पडीक अवस्थेत हा किल्ला नसून बर्यापैकी भक्कम आणि मजबूत अवस्थेत हा किल्ला आढळून आला. किल्ल्यावर पोहचल्यावर आमचे पाय खेचले गेले ते समुद्राच्या दिशेने आणि मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचे एक सुंदर रूप किल्ल्यावरून पाहावयास मिळाले.

किल्ल्याकडे पाहून वाटलं होता कि ह्या किल्ल्याचा मूळ उद्देश हा फक्त पहारा देण्यासाठीच आहे पण ह्या किल्ल्याला सुद्धा एक रोचक असा इतिहास दडला आहे.

इ.स १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबईच्या लहान लहान बेटांपैकी सात बेटे हि ब्रिटिशांना आंदण दिली कारण ब्रिटिश हे आपला तळ सुरत वरून मुंबईत हलवत होते. असे म्हंटले जाते कि ब्रिटिशांमध्ये म्हणजेच भारतात पाय रोवू घालत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनी आणि मुघलांमध्ये त्या काळी युद्धे होत होती. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या अनुषंगाने मूळच्या आफ्रिकन असलेल्या सिद्दींची आणि मुघलांची हातमिळवणी झाली कारण सिद्दींसाठी ब्रिटिश हे शत्रूच होते.

सिद्दीच्या हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी इ.स १६७२ मध्ये मुंबई किनारपट्टीवर तटबंदी बांधण्यास सुरुवात केली होती आणि मग त्यातून इ.स १६८० रोजी शिवडीचा किल्ला हा अस्तित्वात आला, परळ बंदराच्या पूर्वेकडील उंचवट्यावर हा किल्ला बांधून पूर्ण झाला.सुरुवातीच्या काळात पन्नास शिपायांचे सैन्य आणि दहा तोफा ह्या किल्ल्यात तैनात करण्यात आल्या आणि एक प्रमुख म्हणून सुभेदार नेमण्यात आला होता.

इ.स १६८९ रोजी सिद्दीचा प्रमुख 'यादी सकट' यांनी त्याच्या विस हजार सैन्यानिशी मुंबई वर चढाव केला आणि पहिला  शिवडीचा किल्ला आणि नंतर माझगाव किल्ला जिंकून कूच माहीमच्या दिशेने केली. नंतरच्या कालावधीत ह्या किल्ल्याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. आणि मग मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून गोडाऊन म्हणून किल्ल्याचा वापर झाला

किल्ल्याचा मूळ हेतू हा 'सरंक्षण' ह्या हेतुसाठी बांधला गेला असल्यामुळे नक्षीकाम किंवा कोरीव काम काही आढळून येणार नाही पण मुंबईच्या पर्व किनारपट्टीचे सौंदर्य ह्या किल्ल्याची शोभा वाढवते ह्यात शंका नाही. किल्ल्यावर माहिती फलिका नाहीत पण काही भाग पाहून हे नक्की धान्याचे कोठारे असतील ह्याची जाणीव होते.
धान्याचे कोठार


सध्या हा किल्ला महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे आणि आणि पहिल्या श्रेणीच्या हेरीटेज (वारसी ) स्ट्रक्चर मध्ये ह्या किल्ल्याचा सहभाग आहे. अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे ऑकटोबर ते मार्च ह्या कालावधीत पूर्व किनाऱ्यावर पाहुणे म्हणून आलेल्या फ्लेमिंगो ह्या पक्ष्याणां  किल्ल्याच्या परिसरातून सहज पाहता येते,.


किल्ल्यावरून दिसणारी मुंबई



 मुंबईकर आणि किल्ला प्रेमींच्या ज्ञात किंवा स्मृतित नसलेला असा हा शिवडीचा किल्ला