Friday, 22 September 2017

'दुर्गाडी' किल्ला

शिवाजी महाराजांची  आई भवानी वर अत्यंत श्रद्धा होती. सुखाच्या क्षणी असो कि कठीण प्रसंग ' जगदंब ' असे म्हणून ते आई चण्डिकेला नेहमीच साद घालत. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले कित्येक किल्ले स्वराज्यात शामिल करून घेतले . ह्या अनेक किल्ल्यांमध्ये असा एक किल्ला जो आई चण्डिकेच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे कल्याण येथे असलेला 'दुर्गाडी' किल्ला.


'दुर्गाडी' किल्ला

दुर्गाडी हा शब्द 'दुर्गा' माता आणि 'गड' म्हणजे किल्ला ह्या शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. ह्या किल्ल्याचे आत्यंतिक महत्व आहे हे कदाचित आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल.

शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते हे तर ठाऊकच आहे पण स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात शिवाजी महाराजांनी इ.स १६५७ साली कल्याण येथूनच केली आणि ह्यात कल्याण बंदराजवळ असण्याऱ्या दुर्गाडी किल्ल्याचा सिंहाचा वाटा होता. ह्या किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्यासाठी गोदी तयार केली. आणि मग ह्या गोदीतूनच स्वराज्याला भक्कम करणाऱ्या आरमाराच्या जहाजांची निर्मिती केली गेली . पुढे ह्याच आरमाराने इंग्रज , पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धींना हैराण करून सोडले. एकाच वेळी अनेक सागरी शत्रूंशी शिवाजी महाराजांनी सामना केला त्याचा पाया खरा 'दुर्गाडी' किल्ल्याने बांधला. दुर्गा मातेची ती कृपाच शेवटी.

दुर्गाडी किल्ला तसा लहान पण सुंदर आहे.  किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ एक कमान आहे. पूर्वी येथे दरवाजा होता   म्हणून त्यास गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात असे. द्वाराजवळच गणेशाची एक मूर्ती आहे.
प्रवेशद्वार

शिवाय किल्ल्यावर दुर्गा मातेचे सुंदर मंदिर आहे.  मंदिराचा प्रवेशद्वार हि सुबक आहे. भक्तांना  वात्सल्य देणारी व शिवाजी महाराजांवर  सदैव कृपाछत्र ठेवणारी दुर्गा मातेची मूर्तीही फार सुंदर आहे. 
दुर्गा मातेचे मंदिर
दुर्गा मातेची मूर्ती
किल्ल्याच्या तटबंदीवरुन खाडीकडचा  भाग सहज दिसतो. आणि आरमाराच्या म्हणजेच एकप्रकारे भारतीय नौदलाच्या  सुरवातीच्या काळाच्या प्रवासाची  साक्ष देऊन जातो.
खाडीवरून दिसणारा 'दुर्गाडी किल्ला '
कल्याण हा प्रांत अगोदर निजामशाह आणि नंतर आदिलशाह च्या ताब्यात होता. इ.स १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या प्रांताचा ताबा मिळवला. कल्याण हा प्रांत भौगोलिक दृष्ट्या स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. उल्हास नदी आणि खाडी किनारी वसलेले कल्याण शहर हे मध्यपूर्व देश आणि रोम पर्यंत चालत असलेल्या व्यापाराचे केंद्र होते.  त्यामुळे स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा प्रांताचा ताबा मिळाल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांच्या चलाख बुद्धिमत्तेच्या जोरावर फक्त व्यापारी केंद्र म्हणून नाही तर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने  आरमाराची सुरवात करण्यासाठी कल्याण शहर आणि दुर्गाडी किल्ल्याची निवड केली.

कल्याण सारखे बंदर स्वराज्यात समाविष्ट झाले. याचे महत्व जाणून शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याची प्रेरणा दिली. किल्ला बांधत असतानाच आबाजी महादेवांना पाया खणत असताना या पायामध्ये अमाप खजिना सापडला. दुर्ग बांधत असताना धनहि मिळाले त्यामुळे आई चंडिकेवर प्रचंड भक्ती आणि  निष्ठा असणाऱ्या महाराजांनी हि तिचीच कृपा समजून ह्या किल्याचे नाव 'दुर्गाडी' हे ठेवले.

आणि अशारितीने  वेगळीच  ओळख असणारा  'दुर्गाडी' किल्ला आजही  आपल्याला  स्वराज्याच्या इतिहासखुणा दाखवत उभा  आहे. 

                                                
                             || जय जगदंब || जय दुर्गे  ||




























माहिती व चित्रफीत : विकिपीडिया व इंटरनेट

No comments:

Post a Comment