Friday, 22 September 2017

'दुर्गाडी' किल्ला

शिवाजी महाराजांची  आई भवानी वर अत्यंत श्रद्धा होती. सुखाच्या क्षणी असो कि कठीण प्रसंग ' जगदंब ' असे म्हणून ते आई चण्डिकेला नेहमीच साद घालत. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले कित्येक किल्ले स्वराज्यात शामिल करून घेतले . ह्या अनेक किल्ल्यांमध्ये असा एक किल्ला जो आई चण्डिकेच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे कल्याण येथे असलेला 'दुर्गाडी' किल्ला.


'दुर्गाडी' किल्ला

दुर्गाडी हा शब्द 'दुर्गा' माता आणि 'गड' म्हणजे किल्ला ह्या शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. ह्या किल्ल्याचे आत्यंतिक महत्व आहे हे कदाचित आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल.

शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते हे तर ठाऊकच आहे पण स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात शिवाजी महाराजांनी इ.स १६५७ साली कल्याण येथूनच केली आणि ह्यात कल्याण बंदराजवळ असण्याऱ्या दुर्गाडी किल्ल्याचा सिंहाचा वाटा होता. ह्या किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्यासाठी गोदी तयार केली. आणि मग ह्या गोदीतूनच स्वराज्याला भक्कम करणाऱ्या आरमाराच्या जहाजांची निर्मिती केली गेली . पुढे ह्याच आरमाराने इंग्रज , पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धींना हैराण करून सोडले. एकाच वेळी अनेक सागरी शत्रूंशी शिवाजी महाराजांनी सामना केला त्याचा पाया खरा 'दुर्गाडी' किल्ल्याने बांधला. दुर्गा मातेची ती कृपाच शेवटी.

दुर्गाडी किल्ला तसा लहान पण सुंदर आहे.  किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ एक कमान आहे. पूर्वी येथे दरवाजा होता   म्हणून त्यास गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात असे. द्वाराजवळच गणेशाची एक मूर्ती आहे.
प्रवेशद्वार

शिवाय किल्ल्यावर दुर्गा मातेचे सुंदर मंदिर आहे.  मंदिराचा प्रवेशद्वार हि सुबक आहे. भक्तांना  वात्सल्य देणारी व शिवाजी महाराजांवर  सदैव कृपाछत्र ठेवणारी दुर्गा मातेची मूर्तीही फार सुंदर आहे. 
दुर्गा मातेचे मंदिर
दुर्गा मातेची मूर्ती
किल्ल्याच्या तटबंदीवरुन खाडीकडचा  भाग सहज दिसतो. आणि आरमाराच्या म्हणजेच एकप्रकारे भारतीय नौदलाच्या  सुरवातीच्या काळाच्या प्रवासाची  साक्ष देऊन जातो.
खाडीवरून दिसणारा 'दुर्गाडी किल्ला '
कल्याण हा प्रांत अगोदर निजामशाह आणि नंतर आदिलशाह च्या ताब्यात होता. इ.स १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या प्रांताचा ताबा मिळवला. कल्याण हा प्रांत भौगोलिक दृष्ट्या स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. उल्हास नदी आणि खाडी किनारी वसलेले कल्याण शहर हे मध्यपूर्व देश आणि रोम पर्यंत चालत असलेल्या व्यापाराचे केंद्र होते.  त्यामुळे स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा प्रांताचा ताबा मिळाल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांच्या चलाख बुद्धिमत्तेच्या जोरावर फक्त व्यापारी केंद्र म्हणून नाही तर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने  आरमाराची सुरवात करण्यासाठी कल्याण शहर आणि दुर्गाडी किल्ल्याची निवड केली.

कल्याण सारखे बंदर स्वराज्यात समाविष्ट झाले. याचे महत्व जाणून शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याची प्रेरणा दिली. किल्ला बांधत असतानाच आबाजी महादेवांना पाया खणत असताना या पायामध्ये अमाप खजिना सापडला. दुर्ग बांधत असताना धनहि मिळाले त्यामुळे आई चंडिकेवर प्रचंड भक्ती आणि  निष्ठा असणाऱ्या महाराजांनी हि तिचीच कृपा समजून ह्या किल्याचे नाव 'दुर्गाडी' हे ठेवले.

आणि अशारितीने  वेगळीच  ओळख असणारा  'दुर्गाडी' किल्ला आजही  आपल्याला  स्वराज्याच्या इतिहासखुणा दाखवत उभा  आहे. 

                                                
                             || जय जगदंब || जय दुर्गे  ||




























माहिती व चित्रफीत : विकिपीडिया व इंटरनेट

Wednesday, 9 November 2016

शिवडीचा किल्ला

एक दिवस मित्रासोबत बोलत असताना मुंबईतल्या किल्ल्यांचा विषय निघाला आणि मुंबईतल्या किल्ल्यांची आम्ही यादी काढू लागलो व  आश्च्यर्य वाटलं कि ह्यापैकी अनेक किल्ले हे आपल्या  नेहमीच्या प्रवासात जवळपासच आहेत शिवाय ह्या किल्ल्यांचा इतिहास हि फार सुंदर आहेच.  लागलीच आम्ही ह्यापैकी एक किल्ला सर करण्याचे ठरवले आणि तो म्हणजे शिवडीचा किल्ला 

शिवडीचा किल्ला

अशाच एका मधल्या वारी सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघांनी शिवडीचा किल्ला बघण्याचा बेत आखला. मी बाईक घेऊन निघालो आणि ह्या मित्राला परळ ला पिक अप केले व शिवडीच्या दिशेने वाटचाल केली. तसा मुंबईच्या दक्षिण पूर्व भागात जाण्याचा संबंध फारच कमी आला होता. हा  विभाग  मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत येत असल्याने लोकवस्ती कमीच होती. बाईक वरून जाताना मध्ये हार्बर लाईन रेल्वेचे फाटक लागले आणि तिथे आम्हाला थांबावे लागले पुष्कळ वेळ झाला तरी फाटक सुरु होत नव्हत कारण अत्यंत कमी वेळात ट्रेन्स जात होत्या.. ह्या फावल्या वेळात आम्ही तिथे काही माणसांना किल्ल्या बद्दल विचारणा केली पण आश्चर्य म्हणजे अनेकांना शिवडीला किल्ला आहे हे माहीतच नव्हते आणि ज्यांना माहित होते त्यांना कसं जायचा ह्याची कल्पना सुद्धा नव्हती. फाटक क्रॉस केल्यावर लागलीच एका दुकानवाल्याला आम्ही विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेने आम्ही कूच केली. आमच्या सवयी प्रमाणे आम्ही अधुन मधून काही जणांना विचारत विचारत किल्लाजवळ जात होतो..

पण किल्ल्याकडे जात असताना एका गोष्टीच आम्हाला आश्चर्य वाटलं कि मुंबईच्या ह्या  दक्षिण पूर्व भागात लोकवस्ती तर नव्हतीच पण वाहने सुद्धा चुकून माकून दिसत होती. आम्ही मुद्दाम बाईक चा स्पीड कमी केला कारण एका बाजूनी हवेचा झोत समुद्राची  चाहूल लागून देत होता आणि आमची नजर कुठे समुद्र दिसतो का ह्या कडे गेली. आमचा वाक्य पूर्ण होतो ना होतो तोवर लहानशी वाट दिसली आणि तिथून समुद्र किनारा दिसला  पुढे गेलो असता एका पोलिसांनी आम्हाला अडवले आणि रेस्ट्रिक्टेड एरिया असल्यामुळे कोणालाही तिचे येण्याची परवानगी नाही असे सांगितले शेवटी त्याच पोलिसांना शिवडीच्या किल्ल्याबद्दल विचारून आम्ही आमचा मोर्चा किल्ल्याकडे वळवला.

पुढे गेल्यावर किल्ल्याची तटबंदी आम्हाला दिसू लागली आणि लागलीच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. एक लहानशी चाळ आणि त्यातली तुरळक घरे व एक दोन मजली इमारत वगळता आसपास जास्त काही वर्दळ नव्हतीच. भरपूर वेळाने आम्हाला माणसांची वस्ती दिसली होती.
किल्ल्यावरच्या पायऱ्या


थोड्या उंचवट्यावर बाईक नेली आणि जिथून पायऱ्यांची सुरवात होते त्या ठिकाणी बाईक आम्ही पार्क केली. आणि किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्यावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या ह्या सुमारे चार ते पाच फूट लांब होत्या.


तटबंदीवरुन दिसणारा समुद्र


पण जशी अपेक्षा केली होती तशा पडीक अवस्थेत हा किल्ला नसून बर्यापैकी भक्कम आणि मजबूत अवस्थेत हा किल्ला आढळून आला. किल्ल्यावर पोहचल्यावर आमचे पाय खेचले गेले ते समुद्राच्या दिशेने आणि मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचे एक सुंदर रूप किल्ल्यावरून पाहावयास मिळाले.

किल्ल्याकडे पाहून वाटलं होता कि ह्या किल्ल्याचा मूळ उद्देश हा फक्त पहारा देण्यासाठीच आहे पण ह्या किल्ल्याला सुद्धा एक रोचक असा इतिहास दडला आहे.

इ.स १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबईच्या लहान लहान बेटांपैकी सात बेटे हि ब्रिटिशांना आंदण दिली कारण ब्रिटिश हे आपला तळ सुरत वरून मुंबईत हलवत होते. असे म्हंटले जाते कि ब्रिटिशांमध्ये म्हणजेच भारतात पाय रोवू घालत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनी आणि मुघलांमध्ये त्या काळी युद्धे होत होती. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या अनुषंगाने मूळच्या आफ्रिकन असलेल्या सिद्दींची आणि मुघलांची हातमिळवणी झाली कारण सिद्दींसाठी ब्रिटिश हे शत्रूच होते.

सिद्दीच्या हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी इ.स १६७२ मध्ये मुंबई किनारपट्टीवर तटबंदी बांधण्यास सुरुवात केली होती आणि मग त्यातून इ.स १६८० रोजी शिवडीचा किल्ला हा अस्तित्वात आला, परळ बंदराच्या पूर्वेकडील उंचवट्यावर हा किल्ला बांधून पूर्ण झाला.सुरुवातीच्या काळात पन्नास शिपायांचे सैन्य आणि दहा तोफा ह्या किल्ल्यात तैनात करण्यात आल्या आणि एक प्रमुख म्हणून सुभेदार नेमण्यात आला होता.

इ.स १६८९ रोजी सिद्दीचा प्रमुख 'यादी सकट' यांनी त्याच्या विस हजार सैन्यानिशी मुंबई वर चढाव केला आणि पहिला  शिवडीचा किल्ला आणि नंतर माझगाव किल्ला जिंकून कूच माहीमच्या दिशेने केली. नंतरच्या कालावधीत ह्या किल्ल्याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. आणि मग मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून गोडाऊन म्हणून किल्ल्याचा वापर झाला

किल्ल्याचा मूळ हेतू हा 'सरंक्षण' ह्या हेतुसाठी बांधला गेला असल्यामुळे नक्षीकाम किंवा कोरीव काम काही आढळून येणार नाही पण मुंबईच्या पर्व किनारपट्टीचे सौंदर्य ह्या किल्ल्याची शोभा वाढवते ह्यात शंका नाही. किल्ल्यावर माहिती फलिका नाहीत पण काही भाग पाहून हे नक्की धान्याचे कोठारे असतील ह्याची जाणीव होते.
धान्याचे कोठार


सध्या हा किल्ला महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे आणि आणि पहिल्या श्रेणीच्या हेरीटेज (वारसी ) स्ट्रक्चर मध्ये ह्या किल्ल्याचा सहभाग आहे. अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे ऑकटोबर ते मार्च ह्या कालावधीत पूर्व किनाऱ्यावर पाहुणे म्हणून आलेल्या फ्लेमिंगो ह्या पक्ष्याणां  किल्ल्याच्या परिसरातून सहज पाहता येते,.


किल्ल्यावरून दिसणारी मुंबई



 मुंबईकर आणि किल्ला प्रेमींच्या ज्ञात किंवा स्मृतित नसलेला असा हा शिवडीचा किल्ला

Friday, 29 July 2016

किल्ले तिकोना

नावावरूनच आपल्याला अंदाज येईल कि हा किल्ला कसा असेल....हो, त्रिकोणी दिसणाऱ्या ह्या किल्ल्याला मिळालेलं 'तिकोना' नाव हे ह्याचा आकारावरूनच आहे  हे  कळून येत. मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना आपल्याला अनेक किल्ले दिसतात पण पुष्कळ वेळेला नक्की ओळखता येत नाही कि आपल्याला दिसलेला किल्ला नक्की कोणता होता. पण तिकोना हा किल्ला लांबूनही स्पष्ट दिसतो आणि त्याच्या त्रिकोणी  आकारामुळे लगेच ओळखता हि येतो. खरं म्हणजे हाच त्रिकोणी आकार किल्ल्याच्या बाह्य सौन्दर्यास भर घालतो.
तिकोना किल्ला

पवना नदी जवळ असणारा हा किल्ला पुण्यापासून साधारणतः ६० किमी आणि मुंबईपासून १२१ किमी अंतरावर आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणांनी नक्कीच लहानपणी पाटीवर किंवा पेपर व वही वर डोंगररांगा आणि त्यामधून येणारी नदी अशा प्रकारचे चित्र काढलेलं असेलच. तिकोना किल्ल्यावरून जेव्हा ह्या सुंदर पवना नदीस नजर पडते तेव्हा लहानपणीच्या ह्या गोष्टीची आठवण आल्यावाचून आपल्याला राहणार नाही.
किल्ल्यावरून दिसणारी नदी
 पवना नदी आणि आसपासचा प्रदेश हा अगदी सुंदर रित्या आपल्याला ह्या किल्ल्यावरून दिसून येतो. तसेच सुमारे ३-४ किमी लांबवर आपल्याला तुंग हा किल्लासुद्धा सहज दिसून येतो. ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० होऊन अधिक फूट आहे त्यामुळे जोरदार हवेचा मारा आपल्यावर होतो आणि सुखावून टाकतो ढगांसोबत वास्तव्य केल्यासारख आपल्याला जाणवून राहतं.


तिकोना हा किल्ला तसा महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक होता आणि ह्याचे ऐतिहासिक महत्व सुद्धा आहेच. इ.स १५८२-८३ मध्ये अहमद निजामशहा यानी जुन्नर या प्रांतावर हल्ला चढवला व आजूबाजूचा बराचसा प्रांत बळकावला. लोहगड काबीज केल्यावर त्याने आपले लक्ष्य तुंग आणि तिकोना कडे वळवले व १५८५ पर्यंत त्यांनी हा किल्ला सर केला आणि निजामशाहीत आणला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५७ रोजी हा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात मानाने आणला. १६६५ रोजी झालेला पुरंदरचा तह सर्वांना ज्ञात आहेच त्या पुरंदरच्या तहामध्ये जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक हा तिकोना किल्ला आहे.

गडावरून आसपासचा प्रदेश तर सुदंर दिसतोच पण त्या व्यतिरिक्त त्रिम्बकेश्वरचे मंदिर
तसेच तुळजाई देवीचे मंदिर व एक फार सुंदर असे 'मंदिर असलेले लेणे' देखील आहे इथे एक फोटो घेतल्यावाचून आपल्याला राहवणाराच नाही.
तुळजाईचे मंदिर व त्यासमोरील तळे

 तिथे एक टाके खोदलेले आहे आणि ह्या लेण्यांसमोर एक तळेही आहे. तसेच हनुमंताची  सुंदर कोरीव काम केलेली मोठी मूर्ती सुद्धा आपल्याला आकर्षून घेते.

हनुमंताची कोरीव मूर्ती

 ह्या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग भातराशीचा डोंगर असे अनेक परिसर न्याहाळून घेता येतात.


वरती किल्ल्यावर जात असताना एक भला मोठा चुन्याचा घाणा आपल्या दृष्टिक्षेपास येतो. हा घाणा जात्याची नक्कीच आठवण करून देतो.
चुन्याचा घाणा
काही ठराविक ठिकाणी अत्यंत  कठीण म्हणता नाही येणार पण चढण्यास आणि उतरण्यास उभट अशा वाटा आहेत इथे मात्र सावधपणाची भूमिका घेणं उत्तम. हे अपवाद वगळता किल्लावर जाणे तसे सोप्पे आहे.






डावीकडे, केळीचे झाड व मोठी पाने

किल्ल्यावर जाताना अनेक जंगली केळीची झाडे आपल्याला दिसतात. ह्या केळीच्या झाडांची पाने मात्र फार लांब आणि मोठी आहेत ज्या ठिकाणी ह्या केळीची झाडे आपल्या दिसतात तसेच  ह्यांच्या पानांची लांबी पाहून कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही..







त्यामुळे तिकोना किल्ल्याला भेट देणं हे आपल्याला सुखावून टाकेल ह्यात काहीच शंका नाही. आणि जर पाऊस पडत असेल तर जरा जास्तच मज्जा अनुभवता येईल ह्यालाहि  दुमत नाही. 




|| जय जगदंब जय दुर्गे ||













काही माहिती विकिपीडिया व मराठीमाती.कॉम मधून आहे

Friday, 17 June 2016

धर्मवीर संभाजी राजे

शिवाजी महाराजांची कीर्ती महान होती. त्यांनी शून्यातून स्वर्ग निर्माण केला व हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. तेव्हा पासून अगदी आजतागायत किंबहुना कायमसाठी मराठ्यांना मानाने जगायला लावले, असा एक
सिंह ज्याचा दरारा संबंध भारतात होता त्या सिंहाचा छावा किती अफाट आणि शूरवीर असेल.
सिंहाच्या जबड्यात घालून हात | मोजीन दात हि जात मराठ्याची ||
 छत्रपति संभाजी राजे उर्फ शंभू राजे यांचा जन्म इ.स १६५७ रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्यात झाला.खरंतर  हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे चालवणं आणि टिकवून ठेवण हि काठीणातली कठीण गोष्ट होती. याची जबाबदारी शंभू राजेंवर होती. असंख्य अडचणी, शत्रू, दगा, फितुरी यांचा सामना करून मराठ्यांचा भगवा दिमाखात फडकवला आणि शिवपुत्र असण्याची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली
पितृप्रेम

संभाजी राजे यांनी अत्यंत लहान वयापासून दुःख, यातना यांचा सामना केला.  शंभू राजेंच्या जन्मानंतर  त्यांच्या अत्यंत लहान वयात त्यांची आई -  सईबाई यांचे निधन झाले पुण्याजवळील 'धाराऊ' नावाची एक स्त्री त्यांची दुध-आई बनली. पुढे त्यांचा सांभाळ जिजाबाईंनी केला. ज्या वाघिणीने शिवरायांना घडवले तिनेच ह्या शंभूराजेंना घडवले अर्थातच शंभू राजे अत्यंत चाणाक्ष आणि हुशार बनले. 

संभाजी महाराज हे अत्यंत सुंदर आणि देखणे होते त्याचं व्यक्तिमत्वसुद्धा त्यांच्या शौर्याप्रमाणे अफाट होतं. शूरता तर त्यांच्या नसानसात भिणली होती. कमी वेळात राजकारणातील सूक्ष्म गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. लहान वयापासून ते शिवाजीराजेंसोबत असल्यामुळे युद्ध आणि राजकारण यातील बारीक बारीक गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे कि शिवाजी महारजांच्या आग्रा भेटीत शंभू राजे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यावेळी त्यांचे वय फ़क़्त ९ वर्ष होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजे इ.स १६७४ पर्यंत शंभू राजे सर्व बाबतीत एकदम तरबेज झाले. खरतर त्यांचा स्वभाव फार विनम्र होता आणि त्यामुळे अनेकांस ते आपले आपलेसे वाटत असत. 

राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे मायेने पाहणारे कोणीही उरले नाही कारण शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी सतत गुंतून राहिले होते. कालांतराने शंभू राजेंचे दरबारातील काही मंडळींशी मतभेद सुरु झाले. इथे बीज रोवलं गेलं येणाऱ्या काळात होणाऱ्या मोठ्या फितुरीचे आणि एका हृदयद्रावक घटनेचे. आण्णाजी दत्तो नामक एक अमात्य दरबारात कारभार पाहत असत. अत्यंत भ्रष्ट अशा अण्णाजी बद्दल महाराजांना कल्पना होती पण ते एक उत्तम प्रशासक असल्यामुळे महाराजांनी दुर्लक्ष केले. शंभू राजेंना हे फार खटकत असत. त्यांना त्यांचा हा भ्रष्ट कारभाराचा त्यांनी सतत विरोध केला. आण्णाजी दत्तो आणि त्यांसोबातची इतर मंडळी शंभू राजेंच्या विरोधात गेली व दरबारात सतत शंभू राजेंना अपमानास्पद वागणूक दिली.
संभाजी राजेंचा राज्याभिषेक व आनंदलेली प्रजा
अनेक हाल अपेष्टा, कटकारस्थान सहन केल्यानंतर इ.स १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोहिमा त्यांनी पार पाडल्या. अत्यंत कमी काळाची कारकीर्द त्यांची पण त्यांच्या  पराक्रम आणि यशामुळे काळाला सुद्धा त्यांनी मागे टाकले. औरंगजेबाचे सैन्य शंभू राजेंच्या सैन्यापेक्षा पाच पट जास्त  होते. किंबहुना त्याकाळी भारतातील नव्हे  तर साऱ्या जगातील शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. पण शंभू राजेंच्या नेतृत्वामुळे मराठ्यांनी कडवी झुंज दिली आणि त्या औरंगजेबाला हैराण करून सोडले. फ़क़्त शौर्य आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मराठ्यांचा ध्वज आसमंतात डौलाने फडकवला.

 गोव्यातील पोर्तुगीज, मैसूरचा चीक्क्देवराय असो कि जंजिऱ्याचा सिद्दी सर्वांना सिंहाच्या ह्या छाव्याने हैराण करून सोडले. व ह्या छाव्याविरुद्ध औरंगजेबास मदत करण्याची कोणाची हिंमत झाली नाही.
जंजिऱ्याची पाहणी करताना
अनेकांनी जंजिरा किल्ला पाहिलाच असेल तिथूनच लांबवर समुद्रात आपल्याला एक किल्ला दिसतो तो म्हणजे पद्मदुर्ग- कासा किल्ला. फार कमी जणास माहित आहे कि  हा किल्ला जंजिऱ्याला झुंज देण्यासाठी  शंभू राजेंनी बांधला आहे. शंभू राजेंच्या ह्या पराक्रामुळे आणि निर्भिडतेपुढे सिद्दी सुद्धा चिंताक्रांत झाले. अनेक शत्रूंना एकाच वेळी झुंज देणारा हा शिवपुत्र शंभू.
शंभू राजे यांनी अनेक कठीण मोहिम जिंकल्या , अनेक किल्ले जिंकले व  बांधले. शूरवीर तर ते होतेच पण उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारसुद्धा होते. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण - राजनीती' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. उत्तम व्यक्तिमत्व, सुंदर व देखणे, शौर्यवान, निर्भीड, अन्यायाची चीड असणारे तसेच संयमी अशा असंख्य गुणवत्ता शंभू राजेंमध्ये होत्या. 

शंभू राजेंशी झुंज देणे तर पार कठीण होऊन बसल्यामुळे आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे आणि  ह्या विराला आता थांबवावेच लागेल ह्या विचाराने औरंगजेबाने तयारी करण्यास सुरुवात केली. इ.स १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. आणि परिस्थिती कठीण झाली शंभू राजेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी अनेक फितूर तत्पर होतेच. अशा अनेक फितुरांचा त्यांनी सामना केला होता पण दुर्दैवाने ह्या वेळेस फितूर निघाला त्यांचा सख्खा मेहुणा- गणोजी शिर्के, काही गावांच्या वतनदारीसाठी हा शत्रुत सामील झाला होता. 

इ.स १६८९ च्या सुरुवातीला शंभू राजेंना त्यांच्या महत्वाच्या सरदारांनी कोकणात संगमेश्वर मध्ये बैठकीसाठी बोलावले १ फेब्रुवारी १६८९ रोजी शंभू राजे रायगडात रवाना होत असताना त्यांच्या मेहुण्याने आणि
शत्रूशी झुंज देताना शंभू राजे
औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरमध्ये हल्ला केला, मजबूत चकमक झाली. नदी सागरास भेटते, इथे तर संपूर्ण सागर नदीस भेटण्यास आला. मोठा सैन्यसागर आणि काही मराठी सैन्य ह्यांनी कडवी झुंज दिली पण संख्यने कमी असल्यामुळे हार पत्करावी लागली आणि शंभू राजे व  कवी कलश ह्यांना जिवंत पकडण्यात आले.  त्यांना औरंगजेबाकडे बहादूरगड - धर्मवीर गडावर नेण्यात आले.  पुढे काय घडले हे आपल्या अंगावर काटा आणेल.

कदाचित इतिहाससुद्धा रडत असेल कारण तो एका अत्यंत भयावह, हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणाऱ्या मृत्यूचा साक्षी होणार होता. औरंगजेबाने शंभू राजेंना सर्व किल्ले स्वाधीन करण्यास आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले अर्थातच शंभू राजेंनी स्पष्ट नकार दिला चिडलेल्या औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांना विदुषकासारखे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक धिंड काढली. शंभू राजे तरीसुद्धा शरण येत नाहीत हे पाहून त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले. त्यांना एका घाणेरड्या उंटावर उलटे बसवले आणि साखळदंडाने बांधून टाकले. आपल्या प्रिय पित्यांनी - शिवरायांनी दिलेली कवड्यांची माळा काढून गळ्यात गुराढोरांना सुद्धा सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधली. गुन्हेगारांना घातल्या जायच्या तशा इराणी लाकडी टोप्या दोघांना घातल्या. फळ्यांचा खोड मानेवर ठेवला आणि दोन्ही हात बांधले व त्या फळ्यांवर घुंगरे बांधली. 

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम इंद्रायणी-भीमा नदीच्या संगमावर तुळापुर येथे हलवला आणि शंभू राजे व कवी कलश ह्यांना तिथेच हलाल करण्याचे ठरवले. कदाचित काळ व वेळ सुद्धा पुढे सरसावण्यास धजत नसतील कारण एका महाभयंकर अशा मृत्यला ते पाहणार होते. 
औरंगजेबाची आज्ञा होताच हबशी पुढे सरसावले. शंभू राजेंचे डोळे - छे हो,  त्या तेजस्वी नेत्रावर आघात होणार होता. जशी रवि रांजणातून  फिरवावी अशा तप्त आणि ज्वलंत सळ्या त्यांच्या डोळ्यात आत आत पर्यंत फिरवल्या, चर्रचर्र आवाज करत कातडी होरपळून निघाली उपस्थित सर्व थरारात होते पण शंभू राजेंनी किंचितसा सुद्धा आक्रोश केला नाही. साधा काटा रुत्ल्यावर आपल्याला वेदना सहन होत नाहीत इथे तर तप्त सळ्याच्या वेदना त्याही डोळ्यात खोलवर !!!!!!!!!!!

जीभ छाटण्यासाठी हबशी आले पण शंभू राजेंनी तोंड बंद केले होते. जबडा उघडण्यासाठी ते राक्षस पुढे आले जोर लावला तरी जबडा उघडेना. त्यांच्या कानावर जोरदार आघात केला.कान दाबले तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता. एकाने मस्तकावर  जोरदार प्रहार केला तरी सुद्धा शंभू राजेंनी जबडा उघडलाच नाही. वाघाच्या जबड्यात हाथ घालणारा तो सिंहाचा छावा सहजसाजी कसा जबडा उघडेल. एकानी युक्ती केली नाक दाबले आणि श्वास घेण्यासाठी शंभू राजेंनी तोंड थोडे उघडले. राक्षसाने डाव साधला आणि साणशीने जीभ खेचली .तलवारीने साssप  वार केला आणि जीभ कापली. खाली पडलेली जीभ वळवत होती. जणूकाही आकांत करत होती, शंभू राजेंपासून विलग होण्याचा शोक करत होती.
मृत्यूलाही नमवताना शंभू राजे
त्यांची मान पकडून पाठीतलं आणि पुढे  छातीवरून कातडं सोलून काढलं आणि जखमेवर मिठाचे पाणी ओतले. तरीसुद्धा ह्या शंभू राजेंनी काहीच आक्रोश केला नाही. हात पाय कापले गेले पण मृत्यूशी झुंज देणं थांबलं नाही. अरे,  एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस मृत्यूशी झुंज दिली, मृत्यूला सुद्धा झुकायला लावलं. हताश झालेला तो दैत्य औरंगजेब शेवटी मस्तक कलाम करण्याची आज्ञा देतो. इ. स ११ मार्च १६८९ गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभू राजेंचे मस्तक कापले जाते. मस्तकाची गुढी उभारली जाते वाजत गाजत इंद्रायणी-भीमा नदीच्या तीरावर आणली जाते. भाला रेतीत रोवतात  आणि त्यावरील असलेल्या त्या पराक्रमीच्या मस्तकातील रक्ताचा थेंब नदीत पडतो जणू कदाचित त्या नदीला सुद्धा आपल्या लेकाचं मस्तक आणि तिच्यावर पडणारा थेंब पाहून हंबरडा फुटला असेल. तीसुद्धा रडत असेल म्हणत असेल "एके काळी  पराक्रम करून माझ्या सभोवती फिरणारा माझा लेक अशा अवस्थेत मला पाहवत नाही. "
तो दैत्य औरंगजेब सुद्धा शेवटी म्हणाला " खरच सिंहाचा छावा होता हा संभा, आम्ही डोळे काढले तरी झुकला नाही, आम्ही जीभ छाटली तरी दयेची भिक मागितली नाही, आम्ही पाय कापले तरी गुडघे टेकवले नाहीत, आम्ही मान कापली तरी ती झुकली नाही. माझ्यासोबत इतर कोणीही नसतं पण हा संभा असता तर मी संपूर्ण जग जिंकलं असतं."

संयम, निष्ठा, शौर्य, धर्माबद्दल प्रेम हे शंभू राजेंकडून शिकावं. ज्यांनी मृत्यला सुद्धा झुंजवलं आणि समस्त जगाला लढायची प्रेरणा दिली अशा संभाजी राजेंना कोटी कोटी प्रणाम.





source: wikipedia, शिवचरित्र भाष्यकार नितीन बालगुडे पाटील यांचे भाषण

Wednesday, 27 April 2016

'कोरीगड'.- एक सोप्पा व सुंदर ट्रेक

जे ट्रेकिंग ला जातात त्यांना वाटत असते कि आपण आपल्या कुटुंबाला सुद्धा कधी तरी ट्रेकिंग ला न्यावे त्यांनासुद्धा सुंदर अनुभव मिळावा व इतिहासाला जवळून पाहता यावं  पण ट्रेकिंग शब्द ऐकून तर अनेकांना असंच वाटत कि रश्शी लावून चढा किंवा कुठलीतरी खडतर वाट जी TV वर  दाखवली जाते तसा काही भलताच प्रकार. पण हा सगळा गैरसमज आहे. आपल्या जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबातील कोणाला आपण नेऊ इच्छितो पण ह्या सर्व गैरसमजुतीमुळे ते येत नाहीत. अशांसाठी एक सोपा ट्रेक म्हणजे 'कोरीगड'. जिथे लहान मुले व वयस्कर व्यक्ती सुद्धा न थकता आरामात जाऊ शकतील .

निसर्ग संपन्न अशा पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरीटेज चा अधिकृत दर्जा आहे अशा नयनरम्य पश्चिम घाटात हा
कोरीगड
किल्ला वसला आहे. पुणे जिल्ह्यात असलेला हा किल्ला लोणावळ्यापासून २० km अंतरावर आहे . तसं कोरीगडावर आपण वर्षात कधीही जाऊ शकतो पण जास्त मज्जा अनुभवाची असेल तर पावसाळ्यात गेलेलं उत्तम. 

समुद्रसपाटीपासून ३००० हून अधिक फूट उंचीवर हा किल्ला आहे त्यामुळे किल्ल्यावरून आजूबाजूचा प्रदेश फार सुंदर आणि नयनरम्य दिसतो. स्वर्गाबद्दल आपण  वेगळीच कल्पना करत असतो कि आजूबाजूला ढग आहेत आपण पूर्णपणे ढगात आहोत वगैरे वगैरे. आपली ही संकल्पना कोरीगडावर पावसाळ्यात गेलात तर नक्की पूर्ण होईल. भरपूर उंचावर असल्यामुळे आजूबाजूला धुकंच धुकं दिसतात आणि अक्षरश १० फुटावर असणारा माणूस सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसत नाही .त्यात हवेचा झोत  आपल्याला ढकलत असतो. कमीत कमी कष्टात अशा अनेक गोष्टींचा अनुभव आपल्याला कोरीगड देतो.
पायऱ्यांवरून ओघळणारे पाणी

 किल्ल्यावर चढताना काही ठिकाणी पायऱ्या आहेत त्यामुळे पाउस पडत असताना ह्या पायऱ्यांवरून ओघळणारे पाणी एका लहान धबधाब्याच्या  रूपात आपले स्वागत करतात. किल्ल्यावर जाताना हे ओघळणारे पाणी आपल्याला आगळी वेगळी मज्जा देऊन जाते. त्यामुळे प्रवासाचा थकवा आपोआप निघून जातोच .




इतिहासात कोरीगडाबद्दल जास्त काही नोंद नाही आहे पण असं मानलं जात कि शिवाजी महाराजांच्या आवडीच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. इ. स १६५७ रोजी स्वराज्यात महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे गड समाविष्ट केले त्यासोबत अजून एका किल्लाला स्वराज्यात येण्याचे भाग्य लाभले तो  म्हणजे कोरीगड. 

११ मार्च १८१८ रोजी कर्नल प्राथर नामक ब्रिटीश अधिकाऱ्याला किल्ला जिंकण्याचा मोह झाला  आणि त्या रीतीने त्यानी प्रयास करण्यास सुरुवात केली. तीन दिवसाच्या अथक परीश्रमानंतरही हा किल्ला त्याला जिंकता येईना. त्यामुळे वैतागून गेलेला प्राथर च्या तोफेचा एक गोळा किल्ल्यावर असलेल्या दारूगोळ्याच्या गोदामात पडला आणि भयंकर आणि प्रचंड असा स्फोट किल्ल्यावर झाला आणि सर्वत्र आगीने कल्लोळ माजवला.  त्यामुळे दारुगोळा तर नष्ट झालाच पण प्राणहानी सुद्धा झाली आणि मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली
कोराई देवी मंदिर


गडावर पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये कोराई देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती प्रसन्नवदन आहे तसेच चतुर्भुज असलेली देवी शस्त्रास्त्रांनी सज्ज असून  दीड मीटर उंचीची आहे.

गडावर एकूण ६ तोफा आहेत. लक्ष्मी मंदिराजवळ सर्वात मोठी तोफ आहे.
गणेश टाके  : उत्तरेकडच्या दिशेत काही छोट्या गुहा आहेत त्याला गणेश टाके असे म्हणतात

धुक्यांनी आच्छादलेलं तळ

तसेच गडावर अजून सुंदर गोष्ट म्हणजे २ मोठी तळी आहेत. पावसाळ्यात धुकं असल्यामुळे ह्या तळ्यांचा सौंदर्यात आणिक भर पडते.










गडावरून कर्नाळा, तिकोना , तोरणा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान , राजमाची,  आणि मुळशी चा जलाशय असा विस्तीर्ण आणि मोठा प्रदेश दिसतो. ह्या व्यतिरिक्त आपल्या नाकाच्या टोकावरून खाली बघितलं तर Aamby valley City सुद्धा स्पष्टपणे दिसते. आणि खाजगी विमानांसाठी असलेलं लहान विमानतळ पण सुंदररित्या दृष्टीक्षेपास पडतं.
Aamby valley City
विमानतळ

पण सर्वात मजेशीर बाब म्हणजे वरील नमूद केलेल्या सर्व गोष्टी आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून बघू शकतो पण थोडी सावधानता बाळगून.. कारण ह्या किल्ल्याची तटबंदी रुंद असल्यामुळे चढणे व चालणे सहजतेने होऊन जाते त्यामुळे एक वेगळीच मज्जा अनुभवण्यास मिळते. 

तटबंदी

कुटुंबासोबत ट्रेक ला जायच आणि सुंदर किल्ला बघायचा असल्यास कोरीगड हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कमी थकव्यात सुंदर गोष्टी अनुभवण्यासाठी कोरीगडाला भेट जरूर द्यावी.

Friday, 26 February 2016

मराठी भाषा दिवस


आपली मातृभाषा ही मराठी, लहानपणापासून आपल्यावर सुंदर आणि श्रीमंत असे  मराठी संस्कार घडत आहेत. मराठी असल्याचा आणि मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच. पण मराठी भाषा कधी उगम झाली तिच्या निर्मितिचा इतिहास नक्की काय ह्याबद्दल नक्कीच मनात कुतूहल आहे, चला थोडक्यात आपण जाणून घेऊया.

भारतातच नव्हे तर साऱ्या जगाची आद्य भाषा म्हणजे संस्कृत आणि ह्याच संस्कृत भाषेमधून जन्मास आलेली म्हणजे मराठी भाषा. जगातल्या जुन्या भाषांपैकी एक म्हणजे १३०० वर्ष किंवा त्याहून जुनी अशी हि मराठी भाषा. भारतात सुमारे ९ कोटीहून अधिक लोक मराठी बोलू शकतात. एकूण भाषिकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी आणि आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.

भारतात आणि संपूर्ण जगात 'दिवस' म्हणजे टीपिकल  'डे' ज  हे साजरे होतच असतात भले ते कसलेही असो. पण भाषा दिवस साजरा करण्याचा मान हे आपल्या मराठीला लाभला आहे आणि आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. किंबहुना हे आपले भाग्य आहे.

२७ फेब्रुवारी हाच 'मराठी दिवस' म्हणून साजरा  का केला जातो. ह्याच कारण म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर अर्थातच कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी  कुसुमाग्रजांचा  जन्म झाला. त्यांच्या सन्मानार्थ आपण हा दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करतो.
कुसुमाग्रजांची अनेक अजरामर संग्रह आहेत त्यापैकी 'नटसम्राट' ह्या महान नाट्यकृतींसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ' वेडात मराठे वीर दौडले सात' हे अंगावर काटा आणणारे गाणे सुद्धा त्यांचेच. तसेच 'कणा', 'किनारा', 'प्रवासी पक्षी' 'माधवी माती' अशी अनेक त्यांची अजरामर काव्ये आहेत. 'कल्पनेच्या तीरावर', 'जान्हवी' , 'वैष्णव' नामक कादंबऱ्याही सर्वज्ञात आहेत. अशा थोर कवींचा वाढदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.

दादासाहेब फाळके ह्यांनी काढलेला राजा हरिश्चंद्र हा भारतातील प्रथम चित्रपट हा सुद्धा मराठीच आहे.म्हणजे मराठी भाषेने चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

मराठी ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अधिकृत भाषा आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दिव व दमण ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मराठीचा अधिकृत दर्जा आहे. विलक्षण गोष्ट म्हणजे भारतासह मोरेशस आणि इस्त्राइल मध्येही मराठी भाषा बोलली जाते. अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये जिथे मराठी भाषिक शिक्षण आणि कामानिमित्त विखुरलेले आहेत अशा देशातसुद्धा मराठी भाषा प्रामुख्याने बोलली जाते उलट आपले मराठी सण उत्सव तिथे साजरे होतच असतात.

मराठी -  मरहट्टे म्हणजेच मरण्यास व मारण्याससुद्धा तत्पर, जीव गेला तरी चालेल पण कोणासमोर झुकणार नाही अशी आमची मराठ्यांची जात संपूर्ण देशात आदर आणि दरारा असलेले मराठे आणि मराठी भाषा ही तत्कालीन प्रमुख आणि अत्यंत महत्वाची भाषा होती त्यामुळे ब्रिटिशांनासुद्धा मराठी भाषेची दखल घ्यावीच लागली ह्याच कारण म्हणजे भारतातील इतर योद्धा घराण्यांनी ब्रिटिशांसमोर नांगी टाकली पण मराठेच पुरून उरत होते. किंबहुना पेश्वांच्या काळात तर मराठी ही प्रथम क्रमाकांची भाषा होती कारण अर्ध्याहून भारतात मराठ्यांचाच डंखा  होता.

भारतात उच्चशिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर मराठी समाज आहे तसेच कला क्रीडा क्षेत्रात देखील मराठी भाषिकांचा पगडा आहे हे आपल्याला सांगायलाच नको. त्यासाठी नावे सांगावी तेवढी कमीच.

मराठी भाषा जर बघायला गेलो तर प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या शैलीनुसार वेगळ्या प्रकारे बोलली जाते. अनेक पोट भाषा आणि बोली भाषा ह्या मराठी मध्ये समाविष्ट आहेत. उदा..कोकणी, अहिराणी, माणदेशी, मालवणी, वऱ्हाडी, इस्त्रायीली मराठी इ. मराठी भाषा ही अगोदर मोडी लिपीत आणि सध्या देवनागरी लिपीत लिहिली जाते.

मराठी भाषेचे किंवा तिच्या बदलाचे एकूण सहा कालखंड आहेत. ते अशाप्रकारे.
१) आद्य काल : इ. स १२०० पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अगोदरचा काळ
२) यादव काल  : इ. स १२५० ते इ. स १३५० - ह्याच काळात वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली.आणि संतांची परंपरा जन्मास आली
३) बहामती काल : इ. स १३५० ते इ. स १६००  - सर्वात कठीण काल - मुसलमानांच्या आक्रमणाचा काळ, ह्या  काळातसुद्धा नृसिंह सरस्वती, जनार्दन स्वामी, चक्रधर स्वामी, एकनाथ , भानुदास अशा अनेक संतांनी साहित्यात भर घातली.
४) शिवकाल : इ. स १६०० ते इ. स १७०० - राजेंचा काल, भरभराटीचा काल, ह्याच काळात स्वराज्याची स्थापना झाली. बहामती काळात झालेल्या फारसी शब्दांचा वापर थांबवून संस्कृत वापरण्यास महाराजांनी प्रवृत्त केले.आणि मराठी भाषा अगदी थाटात पुढे आली.
५) पेशवे काल : इ. स १७०० ते इ. स १८१८, अनेक वाड्मय, लावणी, पोवाडे ह्यांची निर्मिती. अर्ध्याहून अधिक भारतात मराठी भाषेचा विस्तार झाला.
६) इंग्रजी कालखंड :  इ. स १८१८ ते आजतागायत. वर्तमान पत्रे, कथा, गद्य लिखाण, नाटकं, नियतकालिके आणि अनेक गोष्टींचा भरभराट. इंग्रजी भाषेचा विस्तार वाढत असताना तग धरून राहिलेली आपली मराठी भाषा

जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठे साहित्य हे आपल्या मराठी भाषेला लाभले आहे. त्याचप्रमाणे भारतातील दर्जेदार चित्रपट हे मराठी भाषेतच बनतात असे  अनेक अमराठी कलाकार आणि दिग्दर्शकांचा म्हणणे आहे. नाटकं किंवा एकांकिका ह्या इतर भाषेत लोप पावत आहेत किंबहुना नामशेष झाल्या आहेत तर आपल्या मराठी नाटकांसाठी आजही प्रेक्षक तुडुंब गर्दी करताना दिसून येतात. प्रांतवाद, भाषावाद , इंग्रजीचा विस्तार अशा अनेक संकटांचा सामना करून मराठी भाषा ही मराठ्यांप्रमानेच तग धरून राहिली आहे. आणि एका योद्ध्यासारखी जणू काही सामना करत आहे. ह्यावरून कवी सुरेश भटांची एक कविता आवर्जून म्हणावी लागेल.

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक आणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी. "


जय जगदंब जय दुर्गे
अंबज्ञ





Sources : wikipedia, marathmati.com

Saturday, 6 February 2016

किल्ले रायगड




हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड....

आपल्यापैकी  अनेक जण ह्या किल्ल्याला भेटले छे छे , भेट नाही दर्शनाला जाउन आलेच असतीलच. दर्शन एवढ्याचसाठी की हा किल्ला अनेक महत्वाच्या आणि पवित्र अशा घटनेचा साक्षीदार आहे  त्यामुळे आपल्या सर्वांसाठी एका तीर्थक्षेत्र असल्याप्रमाणे  हा किल्ला आहे.